बंगळुरू- मुंबई विमानसेवा 1 ऑगस्टपासून

Foto
दिल्ली विमानसेवेपाठोपाठ इंडिगो कंपनी आता 1 ऑगस्टपासून बंगळुरू आणि मुंबईसाठी विमानसेवा सुरू करणार आहे. त्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून ठप्प पडलेल्या या विमान सेवेला गती येणार असल्याचे बोलले जाते. लॉक डाऊन मुळे गेल्या तीन महिन्यापासून ठप्प असलेल्या विमान सेवेला गेल्या महिन्यात प्रारंभ झाला. 
इंडिगोने औरंगाबाद -दिल्ली अशी विमानसेवा सुरू केली. आठवड्यातून तीन दिवस ही सेवा सुरू आहे. आता इंडिगो पुन्हा येत्या 15 जुलैपासून हैदराबाद शहरासाठी विमानसेवा सुरू करीत आहे. त्याचबरोबर एक ऑगस्ट पासून बेंगलोर आणि मुंबई या शहरांसाठी विमानसेवा सुरू करण्याची तयारी इंडिगोने केली आहे. विशेष म्हणजे कंपनीने या सेवेसाठी छोटे विमान सज्ज केले असून 70 प्रवाशी आसन क्षमता असलेले विमान वापरले जाणार आहे. त्यामुळे औरंगाबादेतून 35-40 प्रवासीही मिळाले तरी ही सेवा सुरू राहील, अशी माहिती प्रसिद्ध उद्योजक सुनित कोठारी यांनी दिली. देशात औद्योगिक क्षेत्राला गती येत असताना आणि राज्य शासनाने हॉटेल सुरू करण्याला परवानगी दिली आहे. त्यामुळे आता अर्थचक्र लवकरच पूर्वपदावर येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
दरम्यान, येत्या काही महिन्यात तरी आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे टूरिस्ट असोसिएशनने आता राज्यांतर्गत पर्यटन सेवेवर भर दिला असून लवकरच पर्यटन विभागासोबत बैठक घेणार असल्याचे कोठारी यांनी सांगितले. राज्यातील दुर्लक्षित पर्यटन स्थळांना जोडणारा आराखडा तयार करण्यात येणार असून पर्यटकांना या स्थळांची सफर घडवण्याचा मानस टुरिस्ट असोसिएशनचा असल्याचे कोठारी म्हणाले.